हनुमान जयंतीचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान भद्रा मारुती (खुलताबाद) येथे अहिल्यानगरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबविले. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम पार पडला. संस्थेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील सामाजिक कार्य सुरु आहे.
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होत असल्याने परिसर स्वच्छ व प्रसन्न वातावरण ठेवण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कदम, अमोल नलगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, भगवान हनुमान हे शक्ती, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. त्यांच्या शिकवणुकीतून आपण समाजसेवेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक कर्तव्य आहे.
मंदिर परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वच्छ, शांत आणि पवित्र वातावरण मिळावे, हीच या अभियानामागील आमची भावना आहे. आज आपण केलेली ही छोटी कृती उद्या मोठ्या बदलाचे रूप घेईल, असा आमचा विश्वास आहे. आपण सर्वांनी स्वच्छतेचा हा संदेश आपल्या गावात, शहरात आणि समाजात पोहोचवावा. ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
