• Thu. Jan 29th, 2026

वाण सावित्रीनिमित्त समाजप्रबोधन व हळदी-कुंकूचा उपक्रम उत्साहात

ByMirror

Jan 28, 2026

गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप; स्त्रीसशक्तीकरणाचा संदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात वाण सावित्रीच्या उपक्रमासह हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. या उपक्रमाअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सौ. विमलताई शिवाजी सुसरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि पारंपारिक सणांना सामाजिक उपक्रमाची जोड देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीला वंदन करून करण्यात आली. पारंपरिक वाण सावित्रीचा आणि समाजप्रबोधन यांची सांगड घालत महिलांमध्ये शिक्षण, आत्मनिर्भरता व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गरजू मुलींना शालेय साहित्य व इतर आवश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.


याप्रसंगी बोलताना सौ. विमलताई सुसरे म्हणाल्या की, आजही कष्टकरी व वंचित समाजामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाबाबत उदासीनता दिसून येते. त्याचबरोबर काही ठिकाणी बालविवाह, महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या सामाजिक समस्या आजही अस्तित्वात आहेत. या समस्यांना आळा घालण्यासाठी येत्या काळात एक सक्षम संघटन उभारून त्यामार्फत सातत्याने सामाजिक कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


सौ. विमलताई सुसरे या गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून महिला सशक्तीकरण, शिक्षण प्रसार आणि सामाजिक प्रबोधनासाठी त्या सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *