• Thu. Mar 19th, 2026

अवैध माती उत्खनन उघड केल्याने सामाजिक कार्यकर्ते रोडे यांना धमक्या

ByMirror

Mar 19, 2026

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी के. के. रेंज परिसरातील प्रकार

गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी; जीवितास धोका असल्याचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील के. के. रेंज (आर्मी प्रशिक्षण) परिसरातून सुरू असलेल्या अवैध माती उत्खननाचा पर्दाफाश केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रोडे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


ढवळपुरी येथील के. के. रेंज भागातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या माती उत्खनन करून 30 ते 40 वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू असल्याची तक्रार अरुण रोडे यांनी 16 मार्च 2026 रोजी केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी सलग तीन दिवस सकाळी 6 ते 9 या वेळेत संबंधित ठिकाणी जाऊन व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच या प्रकरणाचे पुरावे माध्यमांना देऊन बातमी प्रसिद्ध करण्यात आली.


दरम्यान, 18 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 1.46 वाजता रोडे पारनेरकडे जात असताना त्यांच्या मोबाईलवर (क्रमांक 7499489093) फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सुरुवातीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र नंतर शिवीगाळ करत स्वतःला एका धनदांडग्या व्यक्तीचा मुलगा” असल्याचे सांगत धमक्या दिल्या. “तू माझ्या गाड्यांचे चित्रीकरण का केले, बातमी का दिली? तुझा कायमचा बंदोबस्त करतो, 15 मिनिटांत येतो,” अशा शब्दांत त्याने धमकी दिल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे.
याचबरोबर संबंधित व्यक्तीने आपल्या वडिलांचे राजकीय संबंध असल्याचा दावा करत पोलीस व महसूल यंत्रणेलाही आपण ‘हप्ते’ देतो, त्यामुळे कोणी काही करू शकत नाही, असा गर्विष्ठ इशाराही दिल्याचे रोडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणी रोडे यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची मागणी केली असून, या व्यक्तीचे माती माफियांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना जीविताचा धोका निर्माण झाल्याने तात्काळ संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *