पत्नीच्या उपचाराचा खर्च अजूनही थकलेला; 15 ऑगस्टपासून मंत्रालयात आमरण उपोषण
देयक मिळाले नाही, उसनावारी केलेल्यांचा तगादा सुरू
नगर (प्रतिनिधी)- पत्नीच्या आजारपण्याची वैद्यकीय देयके तीन वर्षे उलटून देखील न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी 15 ऑगस्ट रोजी मुंबई मंत्रालय येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सदर वैद्यकीय बीलाची देयके तात्काळ मिळण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जलसंपदा विभागाच्या सचिवांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी स्विकारले. यावेळी जालिंदर बोरुडे, रतन तुपविहीरे, सयाजी वाव्हळ, इंजि. राजहंस देसाई उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे अहिल्यानगर पाटबंधारे विभागात कार्यरत असताना त्यांच्या पत्नी हेमलता जालिंदर बोरुडे या निमोनियाने आजारामुळे रुबी हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट होत्या. जवळपास 27 दिवस अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरु असताना त्यांचे 31 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या औषधोपचाराच्या खर्चाची रक्कम 13 लाख 3 हजार 993 रुपयाची वैद्यकीय देयके अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र नाशिक प्राधिकरण कार्यालयाकडून जलसंपदा सचिव यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. यासंदर्भात दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही वैद्यकिय देयके मिळण्याबाबत काही कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
औषधोपचारासाठी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम न घेतल्याने नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे उसनवारी पैसे जमा करुन हॉस्पिटलचे बील अदा करण्यात आले. सदरचे वैद्यकीय बिलाची रक्कम अद्याप पर्यंत न मिळाल्यामुळे ज्यांच्याकडून उसनवारी पैसे घेतले आहेत, त्यांनी त्यांची रक्कम वेळेवर परत मिळण्यासाठी तगादा लावला आहे. ही रक्कम परत करू शकलो नसल्याने, त्यांचे आर्थिक व्यवस्थापन बिघडले आहे. त्यांच्याकडून सातत्याने मानहानी होत असून, तोंड चुकवून रहावे लागत आहे. झालेली उसनवारी व वैद्यकीय देयके मिळत नसल्याने आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिकट झाले असल्याचे बोरुडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी जलसंपदा मंत्री व जलसंपदाचे सचिव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही वैद्यकीय देयका संदर्भात प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. दोन वर्षे उलटून देखील वैद्यकीय देयकाची रक्कम मिळत नसल्याने मुंबई येथे 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावरही काही निर्णय न झाल्यास भविष्यात आत्मदहन करण्याचे त्यांनी म्हटले आहे.