• Sat. Mar 7th, 2026

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब रामभाऊ शिंदे यांना बालाघाटमध्ये मानद डॉक्टरेट प्रदान

ByMirror

Mar 7, 2026

राष्ट्रीय साहित्य व पुरातत्त्वाच्या 24व्या अधिवेशनात सन्मान


सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व ॲन्टी रॅगिंग क्षेत्रातील कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब रामभाऊ शिंदे यांना इतिहास व पुरातत्त्व संशोधन संस्थान आणि वीर अकादमी, बालाघाट (मध्यप्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय साहित्य व पुरातत्त्वाच्या 24व्या अधिवेशनात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य तसेच ॲन्टी रॅगिंग मिशनमधील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.


पुण्यसलिला वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या बालाघाट शहरात हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. देशातील तब्बल 15 राज्यांमधील नामवंत पुरातत्त्ववेत्ते, इतिहासकार, साहित्यिक, समाजशास्त्रज्ञ, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई (महाराष्ट्र) येथील डॉ. फिरदोस शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. विद्रसिंह गहरवार, डॉ. कुलदीप बिल्थरे, डॉ. जगदीशचंद्र वर्मा, डॉ. कविता गहरवार आदी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब शिंदे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.


बाबासाहेब रामभाऊ शिंदे हे बापूराव जानकोजी शिंदे (सरकार) या राजघराण्याचे वंशज असून त्यांनी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांतून समाजसेवेचा ध्यास घेतला आहे. ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी त्यांनी रोजगारनिर्मिती कार्यक्रम आयोजित केले. गावागावातील नागरिकांना एकत्र करून विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.


महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी ‘राजमाता मानव्य सेवाभावी संस्था’ या माध्यमातून विविध उपक्रम सुरू केले. या संस्थेद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन व स्वावलंबनासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भारतीय आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी बाबासाहेब शिंदे यांनी ‘यशवंतराजे भारतीय आयुर्वेद संगोपन’ अभियानांतर्गत देशभर बाईक रॅली काढली. या अभियानादरम्यान त्यांनी अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊन नागरिकांना आयुर्वेद, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.


तसेच विविध सामाजिक प्रश्‍नांवर त्यांनी मोर्चे, आंदोलने आणि जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेत नाशिक उपविभागीय स्तरावर पदाधिकारी म्हणून काम केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातही त्यांनी कार्यकर्ते म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला. आदिवासी विकासाच्या प्रश्‍नांवर काम करताना त्यांनी ‘एकलव्य आदिवासी संघटना’ या संघटनेत राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम केले. तसेच एकलव्य पक्षाचे नेते रेवणनाथ जाधव यांच्या मोर्चा व आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


दिनदलित, मागासवर्गीय व झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन व सुरक्षा दलाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. वारकरी संप्रदायातील परंपरा जपत त्यांनी संतसेवेचे कार्यही केले आहे. हभप आत्माराम बाबा महाराज, हभप बन्सी महाराज तसेच हभप बाळकृष्ण महाराज भोफ्लदे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाच्या सेवेत त्यांनी योगदान दिले. याशिवाय राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो ऑफ इंडिया (NCBI) मध्ये जिल्हा समन्वयक म्हणूनही ते कार्यरत आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ॲन्टी रॅगिंग फोर्सच्या पथकाचे प्रमुख अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित व सुसंस्कृत वातावरण निर्माण करण्यासाठी ते काम करत आहेत.


सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीच्या विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल घेत बाबासाहेब रामभाऊ शिंदे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानाबद्दल विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *