• Wed. Jul 2nd, 2025

निमगाव वाघात मंगळवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

ByMirror

Apr 21, 2025

बुधवारी कुस्ती हगामा तर गुरुवारी रंगणार बैलगाडा शर्यत

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.22 एप्रिल) गावात यात्रा उत्सव व बुधवारी (दि.23 एप्रिल) कुस्त्यांचा हगामा रंगणार असून, संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस होणार आहे. तर यावर्षीचे विशेष आकर्षण गुरुवारी (दि.24 एप्रिल) बैलगाडा शर्यत होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी दिली.


नुकतेच गावातील युवकांनी गंगाजल आणण्यासाठी शुक्रवारी (दि.18 एप्रिल) रात्री पारंपारिक वाद्यांसह मिरवणूकीने कावड घेऊन प्रवरा संगमकडे प्रस्थान केले. गावातील युवकांचा जथ्था कावडी घेवून मंगळवारी यात्रेच्या दिवशी सकाळी 8 वा. गावात परतणार असून, मोठ्या उत्साहात कावडीची गावामधून डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी 10 वाजता श्रीबिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा केली जाणार आहे. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 9 वाजता छबीना मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीच्या समाप्तीनंतर नर्गिस पुणेकर यांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.


यात्रेनिमित्त गावातील बिरोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावात कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे. तर संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस होणार आहे. गावातील यात्रा व संदल-उरुसच्या कार्यक्रमातून धार्मिक एकतेचे दर्शन घडणार आहे. गुरुवारी होणारी बैलगाडा शर्यत या यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.


या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच लताबाई फलके, उपसरपंच किरण जाधव, देवाचे भगत नामदेव भुसारे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, बाबा जाधव, अनशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, रामदास वाखारे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, व्हाईस चेअरमन जालिंदर आतकर, अतुल फलके, पांडूरंग गुंजाळ, संजय डोंगरे, ठकाराम शिंदे, अंबादास निकम, मेजर शिवाजी पुंड, संदीप डोंगरे, भानुदास ठोकळ, डॉ. विजय जाधव, वसंत फलके, अनिल डोंगरे, संजय कापसे, गुलाब केदार, वैभव फलके, भरत फलके, अण्णा जाधव, साहेबराव बोडखे, गोकुळ जाधव, राजू शेख, दिलावर शेख, आदम शेख आदीनी केले आहे. यात्रा उत्सव व संदल-उरुस यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *