• Sun. Jul 6th, 2025

श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने

ByMirror

Jul 6, 2025

श्री मार्कंडेय विद्यालयाच्या दिंडीने वेधले लक्ष; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा


दिंडीतून पर्यावरण संवर्धन व मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश

नगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात सावेडी उपनगरातून दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा व मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश दिला. विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा…, माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल नामाच्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझिम व ढोल पथकासह दिंडी सोहळा रंगला होता.


प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, विश्‍वस्त राजेंद्र म्याना, शंकर सामलेटी, शंकर येमुल, श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, माजी नगरसेवक मनोज दुलम यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करुन या सोहळ्याला प्रारंभ झाले. यावेळी सचिव प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे आदींसह सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दिंडीच्या अग्रभागी असलेल्या पालखी समोर विद्यार्थ्यांनी लेझिमचे डाव सादर केले. दिंडीच्या कार्यक्रमानिमित्त शालेय विद्यार्थिनी समिक्षा मुत्त्याल, श्रेजल कल्याण, पायल खेत्रे, अनुष्का रामगिरी यांनी शिक्षिका सुचिता भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल-रुक्मिणीची भव्य रांगोळी साकारली होती. दिंडीत विद्यार्थी वारकरींच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुलस वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व वीणा हातात घेऊन बाल वारकऱ्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, जिजाऊ, श्रीकृष्ण, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले.


श्रमिकनगरच्या बालाजी मंदिर समोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भिस्तबाग चौक, वैदूवाडी येथून मार्गक्रमण करत शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप झाला. दिंडी यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षिका भारती गाडेकर, अनिता आडेप, उमा सिद्दम आदींसह सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *