धनशक्ती व दहशतीविरोधात जनशक्तीचा एल्गार करुन शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये भयमुक्तीचा संदेश देत विकासासाठी सर्वसामान्य उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करणारी प्रचार रॅली काढण्यात आली. रामचंद्र खुंट येथून या प्रचार रॅलीची सुरुवात झाली. प्रभागातील विविध भागांतून मार्गक्रमण करत शिवसेना उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
या रॅलीत शिवसेना (शिंदे गट)कडून प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवणारे उमेश (गणेश) खंडेराव कवडे (अ), सुनिता संतोष गेनप्पा (ब), वैष्णवी सतीश मैड (क) आणि नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी (ड) हे उमेदवार सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत शक्तीप्रदर्शन केले. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले. या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवाराला नुकताच धमकावण्याचा प्रकार घडलेला असताना, या पार्श्वभूमीवर समर्थकांनी हातात ‘भयमुक्त प्रभाग’ असे संदेश देणारे कटआऊट घेऊन दहशतमुक्त निवडणुकीचा निर्धार व्यक्त केला. ही निवडणूक धनशक्ती व दहशतीविरोधात असल्याचे शिवसेनेच्या उमेदवारांनी सांगितले.
यावेळी उमेश (गणेश) कवडे म्हणाले की, प्रभागातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद हा पैसे देऊन आणलेला नसून, स्वतःहून सहभागी झालेल्या मतदारांचा आहे. या निवडणुकीची सूत्रे नागरिकांनी स्वतःच्या हातात घेतली आहेत. ही निवडणूक धनशक्तीविरोधात व दहशतमुक्तीसाठी असून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रभाग दहशतमुक्त करण्याचा हा संकल्प आहे. दर पाच वर्षांनी पक्ष बदलून दुसऱ्या प्रभागातून येऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार थांबवणे गरजेचे आहे. सर्वसामान्य उमेदवारांना लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
वैष्णवी मैड आणि सुनिता गेनप्पा यांनीही शिवसेना हा सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारा पक्ष आहे. जनतेच्या सेवेसाठी सामान्य कुटुंबातून आलेले उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, विकासासाठी त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
