सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने नालेगाव परिसरातून रॅली काढण्यात येत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना (शिंदे गट) कडून उमेश (गणेश) खंडेराव कवडे (अ), सुनिता संतोष गेनप्पा (ब), वैष्णवी सतीश मैड (क) व नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी (ड) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसैनिक, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नालेगाव परिसरातून मार्गक्रमण करत रॅलीदरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेनेचे अधिकृत चिन्ह असलेले धनुष्यबाण व भगवे ध्वज हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
उमेश (गणेश) कवडे म्हणाले की, प्रभाग क्रमांक 11 मधील बहुतांश परिसर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा मोठा जनसमुदाय या भागात आहे. त्याच विचारांना पुढे घेऊन शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महापालिकेत नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचा उल्लेख करत कवडे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे आणि त्यांच्या हाकेला तत्काळ धावून जाणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
