महाराजांचा जयघोष करुन अभिवादन
नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भिंगार मारुती मंदिर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, भिंगार छावणीचे उपाध्यक्ष वसंत राठोड, युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, सुनीलभाऊ कर्डिले, दिलीपराव ठोकळ, दीपक धाडगे, संतोष बोबडे, जनाभाऊ भिंगारदिवे, अशोकराव जाधव, संतोष धीवर, मच्छिंद्र भिंगारदिवे, बाळासाहेब शेकटकर, राजेश तनपुरे, शिवाजीराव बेरड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, महिलांना सन्मान, बुद्धीचातुर्य, युद्धपारंगत असे अष्टपैलू गुण होते. रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने महाराजांनी निर्माण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभाजीराव भिंगारदिवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी धाडसी असे रयतेचे राजे होते. त्यांनी पराक्रमाने अशक्य असे स्वराज्याचे स्वप्न साकारले. महाराजांना बालवयातच राजमाता जिजाऊंनी चांगले संस्कार व शिकवण देऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली होती. महाराजांनी प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही, ते सर्वांना समान न्याय, सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या प्रमाणे वागले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजात कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.