• Sun. Nov 2nd, 2025

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे यांची नियुक्ती

ByMirror

Aug 21, 2023

शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीसह संघटनेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्‍नावर राज्यभर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांची तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शशिकांत थोरात (श्रीरामपूर) यांची नियुक्ती करण्यात आली.


शहरातील दादा चौधरी विद्यालयात शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारणीसह संघटनेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष शरद दळवी, महानगरचे माजी अध्यक्ष व प्रांत कार्यकारणी सदस्य सखाराम गारुडकर, नेते विठ्ठल ढगे, प्रांत कार्यकारणी सदस्य सुनील सुसरे उपस्थित होते.


बाबासाहेब बोडखे हे पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे शिक्षक असून, अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम पाहत आहे. यापूर्वी देखील त्यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांवर आवाज उठवून ते प्रश्‍न सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यवाहपदी अवतार मेहेर बाबा विद्यालय, अरणगाव येथील शिक्षक बाबासाहेब ढगे, उपाध्यक्षपदी अकोला येथील सचिन वाकचौरे, कोषाध्यक्षपदी कौडगाव येथील बबन शिंदे, महिला आघाडी अध्यक्षपदी संगीता हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


महानगर जिल्ह्याच्या कार्यवाहपदी रामराव चव्हाण विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे तर उपाध्यक्षपदी हिंद सेवा मंडळाचे दीपक शिंदे, कोषाध्यक्षपदी दादा चौधरी विद्यालयाचे प्रसाद सामलेटी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उच्च माध्यमिक संवर्गामध्ये मार्कंडेय विद्यालयाचे प्राध्यापक अनिल आचार्य, उपाध्यक्षपदी श्रीकांत शेलार, कार्यवाहपदी प्राध्यापक किशोर आहिरे, कोषाध्यक्षपदी प्रा. सचिन गुंजाळ यांची तर जुनी पेन्शन योजनेच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण पवार, कार्यवाहपदी दिलप रोकडे यांची निवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शिक्षक परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *