तांबोळी यांची प्रत्येक समाज घटकाशी नाळ जुळलेली -प्रविण जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आष्टी तालुक्यातील दौलावडगाव (जि. बीड) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य प्रविण जाधव यांनी तांबोळी यांचा सत्कार केला. यावेळी किरण घोडे, मोहंमद सय्यद, भारत थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रविण जाधव म्हणाले की, शौकतभाई तांबोळी यांची प्रत्येक समाज घटकाशी नाळ जुळलेली आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख असून, कृषी क्षेत्रात त्यांचे विविध प्रयोग शेतकरी बांधवांना दिशा देणारे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असलेला त्यांचा जनसंपर्कामुळे निश्चितच पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांच्यामागे शक्ती उभे करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना हाजी शौकतभाई तांबोळी यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी शेतकरी व बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरण राबविले आहे. त्यांचे विचार घेऊन कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
