शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युचा सामाजिक उपक्रम
गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज -मानसी सारोळकर
नगर (प्रतिनिधी)- शहरातील शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युच्या माध्यमातून बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलींसाठी नवीन कपडे शिवून देण्यात आले. सारोळकर परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी मानसी सारोळकर, सौरभ सारोळकर, किशोर सारोळकर, निकिता धर्मे, सायली उगले आदी उपस्थित होते.
मानसी सारोळकर म्हणाल्या की, गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य बालघर प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे. या सामाजिक कामाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गरीब- श्रीमत ही दरी दूर करण्यासाठी दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी प्रभावीपणे कार्य करावे लागणार आहे. अशा घटकातील विद्यार्थ्यांकडे कमीपणाने न पाहता त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युच्या विद्यार्थ्यांनी मानसी सारोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालघर प्रकल्पातील मुलींच्या कपड्याचे माप घेऊन ते आकर्षक पध्दतीने शिवले. या कामासाठी त्यांना मीनाक्षी गायकवाड, वैष्णवी मजकूर, शिवांगी वकोडे, विद्या टाके, नाझिया शेख यांचे सहकार्य लाभले.