निलंबन करुन उच्चस्तरीय चौकशीची मागणी
जिल्हाधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवेदन
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्या विरोधात भ्रष्टाचार, अवैध वसुली, पदाचा गैरवापर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गंभीर आरोपांची तक्रार जिल्हाधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी सदर मागणीचे निवेदन देऊन, सुरु असलेल्या अनागोंदी प्रश्नी लक्ष वेधले आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गीता शेजवळ यांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. ही कारवाई ही वैयक्तिक द्वेषातून व बदनामीच्या हेतूने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्यारे खान यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बेकायदेशीर शाळांविरुद्ध मोहीम राबवली असून, अल्पसंख्याक मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी काम केले आहे. आजवर त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही, तरी त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी शेजवळ यांनी पोलिसांकडे एनसी नोंदवली असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदनात पुढे मोटर वाहन निरीक्षक शेजवळ यांच्या सेवाकाळातील विविध गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूर, उस्मानाबाद, सोलापूर व रामटेक येथे कार्यरत असताना त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420, 409, 465, 468, 477 (अ), 120(ब), 109, 201 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 13 ड (2) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे सांगितले गेले.
अवैध वसुली न केल्यास वाहन अडवणे, मारहाण करणे व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी. यासंदर्भात पुरावे उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद आहे.
नागपूर चेकपोस्टवर ट्रकचालकांना घाबरवण्यासाठी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचा गंभीर गुन्हा नोंद आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. निरपराध ट्रान्सपोर्टर व वाहनमालकांना खोटे गुन्हे लावून छळ करण्यात येतो. त्यामुळे शासनावरचा जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
गीता शेजवळ यांची स्वतंत्र उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, चौकशीदरम्यान त्यांना तात्काळ निलंबित करून मुख्यालयाशी जोडावे, जुन्या व नवीन सर्व गुन्ह्यांची माहिती एकत्र करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, ट्रान्सपोर्ट व प्रायव्हेट बस चालकांवरील छळ तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.