मुलींच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचा वरिष्ठ महिलांचा संघ पालघर येथे सुरु झालेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला आहे. सातारा बरोबर झालेल्या सामन्यात अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करुन दणदणीत विजय संपादन केला. 6-1 गोलने अहिल्यानगरचा संघ विजयी ठरला.
16 ऑगस्ट पर्यंत ही फुटबॉल स्पर्धा सुरु असून, अहिल्यानगरच्या संघाने आगेकुच केली आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांचे सक्षम संघ आपापले कौशल्य सादर करत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ देखील उत्तम तयारीसह या स्पर्धेत उतरला आहे. जिल्हा संघाची निवड जिल्हास्तरीय निवड चाचण्यांद्वारे करण्यात आली असून, खेळाडूंनी गेल्या काही आठवड्यांपासून सराव सत्रात भाग घेतला होता.
अहिल्यानगर संघात राणी कदम (कर्णधार), सोनिया दोसाणी, प्रियांका आवारे, सुर्यनयना, श्रेया कावरे, पूजा भिंगारदिवे, महिमा पाथरे, आयेशा सय्यद, वैष्णवी रोकडे, तनिषा शिरसुल, सुमैय्या शेख, निकिता भिंगारदिवे यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक म्हणून शशांक वाल्मिकी व संघ व्यवस्थापक म्हणून काजल वाल्मिकी काम पाहत आहे.
अहिल्यानगर संघाने मिळवलेल्या विजयाबद्दल जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंग मिन्हास, अमरजितसिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंग परमार यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.