महिला दिनाचा यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य
भजन कार्यक्रमाचा महिलांनी लुटला आनंद
नगर (प्रतिनिधी)- वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना जवळ करुन व साडीचोळीने त्यांचा महिला दिनी सन्मान करण्यात आला. समाजापासून दुरावलेल्या वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवून यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विळद घाट येथील मातोश्री वृधाश्रमात झालेल्या या कार्यक्रमासह भजनांची मैफल देखील रंगली होती. यामध्ये सर्व महिलांनी भक्तीरसाचा आनंद घेतला.
मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा मायाताई कोल्हे म्हणाल्या की, कर्मकांडापेक्षा माणसातील माणुसकीने भरलेली हृदय सर्वश्रेष्ठ असते. जीवनात प्रत्येकाने जेष्ठांची सेवा केली पाहिजे. ज्येष्ठांची केलेली सेवा ही एक पूजा असून, त्याचे फळ आपल्या नक्की मिळते. ज्येष्ठांना समाजातील अडगळ न मानता, त्यांच्याशी ऋणानुबंध जपण्याचे त्यांनी आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष गीतांजली काळे यांनी वृध्दांच्या आनंदासाठी जे देता येईल, ते देत जावे. ज्येष्ठांची सेवा केल्याचा प्रत्येकाला मनस्वी समाधान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराध्यक्षा मीराताई बारस्कर यांनी आज मातोश्री वृध्दाश्रमात आजी-आजोबा पाहून मन हेलावते, पण त्यांच्या सेवेतून एक वेगळा आनंद मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा उपाध्यक्षा कविता दरंदले म्हणाल्या की, वृध्दाश्रमातील ज्येष्ठांसाठी नेहमीच यशवंती मराठा महिला मंडळाचे सहकार्य राहणार आहे. ज्येष्ठांनी आपले पुढील जीवन आनंदाने घालविण्यासाठी छंद जोपासण्याचे आवाहन केले. माजी जिल्हाध्यक्षा उर्मिला वाकळे यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आशाताई शिंदे यांनी जीवनात चढ-उतार येणारच आहेत. मग तरीही जीवनातील प्रत्येक परिस्थितीला स्वीकारून पुढे जावेच लागणार असल्याचे सांगितले.
वृद्धाश्रमातील जेष्ठांसाठी संत नामदेव भजनी मंडळाने विविध भक्ती गीते व भजन सादर केली. एकापेक्षा एक सरस भक्तीगीतांमधून संपूर्ण वातावरण भक्तीमय व प्रसन्न बनले होते. भजन मंडळीतील अनिताताई वाधवणे, मनीषा वाधवणे, स्वाती काळेकर, सारिका सरोदे यांनी विविध भजन व भक्ती गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
वृध्दाश्रमातील महिलांना साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वंदनाताई गोसावी यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी यशवंती मराठा महिला मंडळाच्या सुरेखाताई कडूस, डॉ. संध्या इंगोले, डॉ. मराठे, मंगल शिरसाठ, शारदा तांबे, मंगल मुरूमकर, मंगल काळे, वर्षा लगड, नंदा मुळे, राजश्री शेळके, कल्याणी शेळके, सविता साळुंके, राजश्री ताकटे, सारिका तट, सुनिता आठरे, संगीता पाणगे, मोहिनी भापकर, सुरेखा बारस्कर, राजश्री पोहेकर, वैशाली दगडे, मंगल शिर्के, ज्योती गंधाडे, लीना नेटके, अर्चना बोरुडे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव यांनी केले. आभार राजश्री शेळके यांनी मानले. वृध्दाश्रम संस्थेचे दिलीप सर यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. यशवंती महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.