गुरुंशिवाय जीवन खडतर -भूषण गुंड
नगर (प्रतिनिधी)- 35 ते 40 वर्षापासून अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांचा केडगावात गुरुपौर्णिमेला सन्मान करण्यात आला. या सत्काराने गुरुजन भारावून गेले. श्री गणेश दत्त देवस्थान ट्रस्ट आणि संदीप कोतकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भूषण अशोक गुंड यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अंबिकानगर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ह.भ.प. स्वानंद महाराज जोशी यांच्या प्रवचन रंगले होते, त्यांनी प्रवचनातून गुरुचे महत्त्व विशद केले.
संदीप दादा कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड म्हणाले की, शिक्षक हा आदर्श समाजाचा पाया आहे. शिक्षकांच्या माध्यमातून भावी पिढी घडत असून, त्यांचा सन्मान होणे गरजेचा आहे. जीवनाला दिशा देण्याचे कार्य गुरु करत असतात. गुरुंशिवाय जीवन खडतर असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर यांनी प्रास्ताविकात समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. नंदकुमार पोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मान-सन्मान देऊन केलेल्या सत्काराबद्दल ज्येष्ठ शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. शरद कोलते, उद्योजक सागर सातपुते, चेअरमन बापूसाहेब सातपुते, मारुती चोबे, आनंद पाठक, खजिनदार संजय बोरगे, शिरीष होंडे, नंदकुमार पोळ, शरद आचारी, दिलीप शेजुळ, अजित पवार, शारदा शेजुळ, वसुधा देशपांडे, प्रतिमा कुलकर्णी, गौरी ठाणेकर, संजय निक्रड, प्रमोद कुलकर्णी, राजेश देशपांडे आदींसह शिक्षक-शिक्षिका, ज्येष्ठ नागरिक आणि युवा मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश देशपांडे यांनी केले. आभार प्रमोद शेजुळ यांनी मानले.