• Thu. Mar 13th, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या 13 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

ByMirror

Mar 12, 2025

शिक्षणाबरोबरच कौशल्य निर्माण करण्यासाठी मासूम संस्थेना दिला विद्यार्थ्यांना आधार

डॉ. पारस कोठारी यांची पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

नगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी व शिक्षणाबरोबरच कौशल्य आत्मसात करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील मासूम संस्थेच्या वतीने भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील 13 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेता येणार आहे.


महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाप्रसंगी रात्र शाळेचे मावळते चेअरमन डॉ. पारस कोठारी, नूतन चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना नागरे, रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे आदींसह रात्र शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


मासूम संस्थेच्या वतीने ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंगसाठी रेश्‍मा पठाण, स्वाती सोनवणे, शारदा मंगलपेल्ली, भाग्यश्री नायडू, रूपाली बिल्ला, निकिता चव्हाण यांना मासूम संस्थेकडून प्रत्येकी 48 हजार रुपये, संगणक प्रशिक्षणासाठी वैष्णवी जोशी, रेखा वाघ,भावना गर्गे, शितल पन्हाळे या विद्यार्थिनींना प्रत्येकी 7 हजार रुपये तसेच ॲडव्हान्स फोटोग्राफी व संगणक प्रशिक्षणासाठी निशांत शेलार, अभिषेक भागडे विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, महिला दिनी त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून, महिलांनी भरारी घेण्यासाठी उच्च शिक्षित होवून व्यावसायिक शिक्षण देखील आत्मसात करावे. रात्र शाळेत शिक्षक तळमळीने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असून, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत असल्याचे सांगितले. रात्र शाळेत कार्य करताना जीवनात आनखी कार्य करण्याची उमेद मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


डॉ. अर्चना नागरे यांनी महिलांचे स्वास्थ्य व दैनंदिन जीवन या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांनी आरोग्याची काळजी घेऊन शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. महिला निरोगी असल्यास संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले ठेऊ शकते. शारीरिक स्वास्थ्य आपल्या हातात असून, योग्य आहार, व्यायामाचे त्यांनी महत्त्व सांगितले.
डॉ. पारस कोठारी यांची पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर नूतन चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले. महिला दिनानिमित्त महिला शिक्षिका उज्वला साठे, वैशाली दुराफे, वृषाली साताळकर, स्वाती होले, अनुराधा दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी युनूस शहा, ज्योती गायकवाड, कविता मरकड, स्नेहल गीते यांनी मनोगत व्यक्त केले.


वृषाली साताळकर यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश भुते यांनी आभार मानले. मासूम संस्थेच्या संचालिका श्रीमती निकिता केतकर, डायरेक्टर युवराज बोऱ्हाडे, कमलाकर माने, करिअर सेल प्रमुख स्नेहल ठाकूर, सीनियर समुपदेशक गजाला शेख यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, मा.कार्याध्यक्ष अनंत फडणीस व सर्व संचालकांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी रात्र शाळेस डसबिन उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *