17 जानेवारीला सावेडीत होणार उद्घाटन; बचत गट स्टॉल वस्तू उत्पादन विक्री व प्रदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बचत गटांचे प्रदर्शन-विक्री, युवा महोत्सव, विविध स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा महोत्सव गुलमोहर रोड कोहिनूर मंगल कार्यालयात 17 ते 20 जानेवारीला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक जय युवा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महेश शिंदे व विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी दिली.
दि.15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला निकाल असल्याने हा महोत्सव दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. अहिल्यानगर महानगरपालिका, जय स्वयंसेवी संस्था संघटना, क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत आदींच्या माध्यमातून हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. महोत्सवामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, दंत तपासणी, मोतीबिंदू शास्त्रीय शिबिर, सर्व जातीय वधू-वर मेळावा, वक्तृत्व, नृत्य, चित्रकला, उखाणा, भजन, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ब्युटी टॅलेंट शो, सामाजिक संस्थांना मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव, आहार मार्गदर्शन, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान, राष्ट्रीय युवा सप्ताह, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार, कवी संमेलन, लोककला सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
