• Sat. Mar 15th, 2025

शासन-प्रशासनातील सत्यमेव जयते! ब्रिद वाक्याच्या उलट कार्याने केडगावला पार पडली निषेध सभा

ByMirror

Feb 22, 2025

ब्रिद वाक्य फक्त नावालाच उरल्याचा आरोप; अरुणोदय क्रांतीसेवा संघ नागरिकांमध्ये हक्काविषयी जागृती निर्माण करणार

नीती भ्रष्टांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनता वैतागली -अरुण खिची

नगर (प्रतिनिधी)- शासन प्रणालीत सत्यमेव जयते! हे ब्रिद वाक्य फक्त नावालाच उरले असताना, या ब्रिद वाक्याचा उलट पध्दतीने सर्वसामान्य नागरिकांना अनुभव येत असल्याचा आरोप करत अरुणोदय क्रांतीसेवा संघाच्या वतीने केडगावला निषेध सभा पार पडली. यामध्ये राज्यातील शासन प्रणालीतील सर्वच ब्रिद वाक्यांचा उपयोग फक्त दाखवण्यासाठी शिल्लक उरल्याची खंत व्यक्त करण्यात आली.


अरुणोदय क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केडगाव, एकनाथ नगर येथील विठ्ठल पार्क येथे बैठक पार पडली. यावेळी दक्षता कमिटीच्या नलिनी गायकवाड, शांतता कमिटीचे सदस्य जंगम देवा, रावसाहेब कांबळे, सुनिता खिची, नयना चायल, दुर्गा सोलीवाल, अक्षय मतकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


अरुण खिची म्हणाले की, शासन प्रणालीत त्यांच्या ब्रिद वाक्याप्रमाणे वागण्याची गरज निर्माण झाली आहे. शासन-प्रशासनामध्ये कोणालाच कोणाचे तालमेल राहिलेले नाही. वास्तविक पाहता गेल्या वीस वर्षाच्या लोकशाहीत एक न धड भारभर चिंध्या, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढला आहे. नीती भ्रष्टांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनता वैतागली आहे. प्रस्थापित ब्रीदवाक्य ही वेशीला टांगलेल्या फलकाप्रमाणे शासकीय कार्यालयात दिसून येतात. संविधानिक घटनेतील नागरिकांचे हक्क, कर्तव्य बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.


भारतीय लोकशाहीत प्रमुख असलेले सत्यमेव जयते! हे ब्रीद वाक्य अमलात येत नाही. हे ब्रीदवाक्य कशासाठी आहे, याची जाणीव सर्वसामान्यांना प्रशासनाच्या कार्यातून होत नाही. या भारत देशाचा पूर्व इतिहास पाहता नेहमी नीतीचा व सत्याचा विजय होत आला आहे. पुन्हा सत्याची बाजू निर्माण होण्यासाठी व सत्यमेव जयते! हे ब्रिद वाक्य खऱ्या पध्दतीने अमलात आणण्यासाठी अरुणोदय क्रांतीसेवा संघाने चळवळ चालवली असल्याची माहिती खिची यांनी दिली.


नागरिकांमध्ये त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव करुन देऊन सत्यमेव जयते! हे ब्रीदवाक्य शासनाकडून अमलात आणण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. या सभेमध्ये विविध कायदे विषयी प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. तर यापुढील काळामध्ये सत्यमेव जयते! या ब्रिदवाक्याचे योग्य वापर होण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन करण्याचा व यापुढील जाहीर निषेध सभा रस्त्यावर घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *