• Thu. Apr 2nd, 2026

सरस्वती प्राथमिक विद्यालयाची दहीहंडी उत्साहात साजरी

ByMirror

Aug 14, 2025

गोविंदा आला रे आला म्हणत… दहीहंडी फुटली

गोकुळाष्टमी निमित्त रंगला बहारदार सांस्कृतिक सोहळा

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जल्लोषमय वातावरणात दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करण्यात आला. राधा व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजलेल्या बालकांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गवळणी आणि कृष्णजन्माच्या गीतांनी कार्यक्रमाला भक्तीमय रंगत आणली.


दहीहंडी फुटताच हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की… या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दणाणून गेला. लहानग्या गोविंदांच्या उत्साहात संपूर्ण विद्यार्थीवर्ग सामील झाला. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाळेच्या अंगणात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या, तसेच फुलांनी सजावट करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवान यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा रंगला होता. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अरुण कुलकर्णी, डॉ. बलराज पाटील, सागर जपकर, बी.एड. कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संभाजी पवार, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्याध्यापक संदीप भोर म्हणले की, दहीहंडी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावनानिर्माण व्हावी, हा उद्देश असतो. विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामधून आपल्या भारताची परंपरा जपण्याचे काम विद्यालय करत असल्याचे स्पष्ट केले.


संभाजी पवार यांनी माखन चोर कृष्णाने आपल्या लीलांमधून प्रेम, एकता आणि धैर्याचं प्रतीक निर्माण केलं, आणि त्यातूनच आज आपण दहीहंडीफ सारख्या उत्सवात एकत्र येतो, एकमेकांच्या खांद्यावर विश्‍वास ठेवून ही उंच हंडी फोडतो. ही फक्त परंपरा नाही, ही एकजूट, सहकार्य आणि जिद्दीची परीक्षा असल्याचे सांगितले.


दादाराम ढवाण यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत आजच्या काळातही, दहीहंडी आपल्याला शिकवते की, स्पर्धा असो, शिक्षण असो, किंवा आयुष्य, जिंकण्याची खरी मजा टीमवर्कमध्ये असते. विद्यालयाचे गोविंदा पथक जेव्हा उंच मनोरा करतात, तेव्हा प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असतो. कोणीतरी पाया घालतो, कोणीतरी वर जातो, पण यश सगळ्यांचं असल्याचे त्यांनी नमुद केले. मनोरे तयार करण्यासाठी अविनाश साठे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता खिलारी यांनी केले.आभार शिवाजी मगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *