ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाभ मिळवून दिल्याबद्दल सन्मान
बहुजन समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटिबध्द -अतुल सावे
नगर (प्रतिनिधी)- ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देणारे मागास बहुजन कल्याण मंत्री आदरणीय अतुल सावे यांचा संत सावता माळी क्रांती परिषद अहिल्यानगरच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या शिक्षणाच्या संधीचे कौतुक करण्यात आले.
मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या सत्कारच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, संतोष विधाते, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते. संत सावता माळी क्रांती परिषदचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार योगेश टीळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. बहुजन समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटिबध्द राहणार असल्याची भावना मंत्री सावे यांनी व्यक्त केली.
गणेश बनकर म्हणाले की, मंत्री अतुल सावे समतेच्या विचारांचे पाईक असून, महात्मा फुले यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जात आहे. तळागाळातील ओबीसी बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या डीबीटी (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर) प्रणालीमुळे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे. यामुळे पारदर्शकता, वेळेची बचत आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आले आहे. या शैक्षणिक सामाजिक सशक्तीकरणामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाया रोवण्याचे कार्य सावे यांनी केले असल्याचेही बनकर म्हणाले.
2022-23 मध्ये महाराष्ट्रातील लाखो ओबीसी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीचा थेट लाभ मिळाला आहे. शिक्षणात समावेशकता वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन वसतिगृहे उभारली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहे.
ओबीसी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात साथ देणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गेल्या काही वर्षांत मोठी आणि ऐतिहासिक वाढ झाली आहे विद्यार्थ्यांना. यामुळे हजारो कुटुंबांच्या स्वप्नांना नवीन दिशा मिळाली आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवावी लागणारी अनेक मुलं पुन्हा नव्या उमेदीनं शिकू लागली असल्याचे संत सावता माळी क्रांती परिषदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.