माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्डिले यांनी नेहमीच पुढाकार घेतला -गणेशभाऊ बनकर
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीतील राहुरी नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. तर माळी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असलेले कर्डिले यांच्या पाठिशी माळी समाज एकवटणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक संस्थामधे माळी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी दिली. तसेच राहुरी शहरात भव्यदिव्य असे माळी समाज भवन आणि वधू वर केंद्र उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे तालुक्यात समाजाला एकजुटीने सामाजिक उपक्रम राबविण्यास मदत होणार असल्याची भावना जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ बनकर यांनी व्यक्त केली.
शिवाजी कर्डिले हे सातत्याने माळी समाजाच्या पाठीशी उभे राहिले असून, संत सावता क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टीळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी संत सावता क्रांती परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, दिलीप भालसिंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, दिनेश बेल्हेकर, गणेश शिंदे, दत्ता राऊत, अविनाश शिंदे, महेश झोडगे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.