• Fri. Sep 19th, 2025

ज्येष्ठ साहित्यिक त्रिंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या ग्रंथाला संत चरित्र गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Sep 1, 2025

तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक त्रिंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या संत आईसाहेब महाराज देशमुख आणि संत पळसेकर महाराज या संत चरित्र ग्रंथासाठी राज्यस्तरीय संत चरित्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


5 सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.


मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील सध्या केडगाव येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ साहित्यिक त्रिंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांनी नुकतेच संत आईसाहेब महाराज देशमुख आणि संत पळसेकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर ग्रंथ लिहिला आहे. भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारा व संत महात्म्यांचे विचार पोहचविणारा हा ग्रंथ उपयुक्त असून, या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांची श्री क्षेत्र मांडवगण आणि सिद्धेश्‍वर दर्शन, आबा मास्टर, द माउंटन मॅन ही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. देशमुख हे मराठी साहित्य मंडळ (मुंबई) या संस्थेचे जिल्हाध्यक्ष असून, ईपीएस 95 या पेन्शनर संघटनेचे शहर कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहे. या संत चरित्र ग्रंथासाठी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *