शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक महेश पालकर, राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांनी आपल्या शाळेचा लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून कायापालट केला.शाळा रंगकाम करून पेंटिंग केली. विद्यार्थ्यांना विविध भौतिक सुविधा मिळविल्या. पिण्याच्या पाण्याची टाकी, संगणक, स्कूल बॅग, स्पोर्ट ड्रेस, वह्या असे विविध शैक्षणिक साहित्य मिळविले. लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध ऑनलाईन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग घेऊन यश मिळविले.
कोरोनाकाळात संपूर्ण जग थांबले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना उत्कृष्टपणे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. कोरोनाकाळापासून निरंतर वाचन उपक्रम त्या राबवीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे. याबाबत त्यांनी राज्यस्तरावर शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक आणि राज्यातील निवडक उपक्रमशील शिक्षक यांच्यासमोर निरंतर वाचन प्रभावीपणे सादरीकरण केले. त्याबद्दल शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांनी त्यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे उपक्रमात आणि वर्चुअल क्लास या राज्यस्तरीय उपक्रमात त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कृतिशील मार्गदर्शन केले. शासनाच्या अनेक विषयांच्या अभ्यासक्रम निर्मितीत त्यांनी काम केले. शासनाच्या पोर्टलवर त्यांचे अनेक ई- साहित्य अपलोड करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होत आहे. त्यांनी राबविलेले नवनवीन उपक्रम राज्यस्तरावर पात्र ठरले. त्याबद्दल त्यांना शासनाच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा विभागाने त्यांच्या निरंतर वाचन उपक्रमाची निवड करून शासनाच्या पोर्टलवर त्यांचे उपक्रम अपलोड केले. लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला, निरंतर वाचन उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, शिकू आनंदे, स्वाध्याय, पर्यावरण संवर्धन, योग प्राणायाम, वाचनालयास भेट देऊन विविध पुस्तकांचे वाचन, मिशन आरंभ, मिशन आपुलकी, गोष्टीचा शनिवार, किशोर गोष्टी, आनंददायी शनिवार असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन संजना चेमटे यांना शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.