जय युवा अकॅडमीच्या वतीने युवतींना मासिक पाळीविषयक स्वच्छता व आरोग्य संदर्भात जागृती
किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्य जागृतीसाठी आयुर्वेदिक नॅपकिनवर भर देण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, त्वचेची काळजी घेणारे, दुर्गंधीपासून मुक्तता देणारे, त्वरित आरामदायी तसेच पर्यावरणपूरक असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांनी व किशोरवयीन मुलींनी अशा आयुर्वेदिक नॅपकिनचा वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी केले.
मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, मोगा ग्रुप ऑफ कंपनीज, जय युवा अकॅडमी व माहेर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवतींसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. हे शिबिर डॉ. ना. ज. पाऊलबुद्धे फार्मसी महाविद्यालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निर्मल नगर येथे पार पडले.
पुढे ॲड. शिंदे पुढे म्हणाले की, आज बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक सॅनिटरी नॅपकिनमध्ये प्लास्टिक व केमिकलयुक्त घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे महिलांमध्ये त्वचारोग, संसर्ग, दुर्गंधी तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका वाढत आहे. यावर उपाय म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक घटकांपासून तयार करण्यात आलेले सॅनिटरी नॅपकिन वापरणे काळाची गरज बनली आहे.
या शिबिरात सोशल वर्कर हेमलता कांबळे यांनी महाविद्यालयीन युवती व किशोरवयीन मुलींना आपल्या आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. प्लास्टिक व रासायनिक घटक असलेले सॅनिटरी नॅपकिन धोकादायक असून त्यामुळे महिलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले.
मार्गदर्शक सुरेखा ढोंन्नर यांनी मुलींनी आपल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आई, शिक्षिका व विश्वासू व्यक्तींशी मनमोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. संवादाची भीती बाळगल्यास समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्राचार्य अनुराधा चव्हाण, मुख्याध्यापिका विजया नवले, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, सारिका कोकाटे, माहेर फाउंडेशनच्या रंजनीताई ताठे, प्रियंका नगरकर, गीता वामन, मनीषा शिंदे, सुरेखा ढोंन्नर, शिक्षिका पौर्णिमा साळुंखे, प्रतिभा शिंदे आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या आरोग्य मार्गदर्शन शिबिरामुळे युवती व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयक स्वच्छता, आरोग्य जपणूक व सुरक्षित सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी ॲड. गायत्री गुंड, ॲड. आरती शिंदे व जय युवाच्या संचालिका जयश्री शिंदे यांनी परिश्रम घेतले.
