वृद्ध, दिव्यांग आणि महिलांसाठी उपयोगी सेवा; भानुदास कोतकर यांच्या हस्ते मंदिर समितीकडे वाहन सुपूर्द
नगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी संदीप उद्योग समूहाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला (पंढरपूर) एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन भेट देण्यात आले. वारीत दर्शनासाठी आलेल्या वृद्ध, दिव्यांग, अपंग, लहान मुले आणि महिलांसाठी हे इलेक्ट्रिक वाहन उपयुक्त ठरणार आहे.
हे वाहन संदीप उद्योग समूहाचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या हस्ते मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी माजी महापौर संदीप कोतकर, उपमहापौर सुवर्णाताई कोतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुप्रियाताई कोतकर, उद्योजक अमोल कोतकर, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, देवस्थानचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, नगरसेवक विक्रम शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
भानुदास कोतकर म्हणाले की, वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सेवा यांचं प्रतीक आहे. या वारीत हजारो वारकरी व भाविक सहभागी होतात. त्यामध्ये वृद्ध, दिव्यांग, अपंग, लहान मुले व महिलांची मोठी संख्या असते. त्यांना मंदिराच्या परिसरात सुरक्षित आणि आरामदायक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल. सेवा हीच खरी पूजा आहे, या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी संदीप उद्योग समूहाने दिलेले हे इलेक्ट्रिक वाहन भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून या उपक्रमाचे कौतुक करुन आभार व्यक्त केले.