कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना क्षमायाचना, आत्मसंयम आणि बंधुत्वाचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा संवत्सरी उत्सव अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. प्राथमिक तसेच माध्यमिक विभागात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना सणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. संवत्सरी उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी क्षमायाचना, आत्मसंयम आणि बंधुत्वाचा संदेश घेतला.
प्राथमिक विभागाच्या वतीने दुपारच्या सत्रात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे सदस्य अभय रसिक लुनिया यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून रीना अभय लुनिया उपस्थित होत्या. या वेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, स्कूल कमिटी सदस्य शैलेश मुनोत, शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, उपप्राचार्या कविता सुरतवाला तसेच शाळेतील शिक्षक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. सुवर्णा मलमकर व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. पाहुण्यांचा परिचय सॅम्युअल-शिंदे यांनी करून दिला. विद्यार्थिनी अनुजा धसाळ, सावी गुगळे आणि मल्हार जाधव यांनी वेगवेगळ्या भाषेत संवत्सरी उत्सवाची माहिती दिली. पर्युषण पर्वात उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी छायाताई फिरोदिया यांनी क्षमापन हे जीवनातील सर्वांत मोठे सामर्थ्य आहे, विद्यार्थ्यांनी ते आचरणात आणून स्वतःमध्ये संस्कार रुजवावेत, असे आवाहन केले. अभय लुनिया म्हणाले की, लहान वयात तीन, पाच, आठ दिवस उपवास करणारे विद्यार्थी हे संस्कृती जपण्याचे मोठे उदाहरण आहे. यामुळे भावी पिढी संस्कारित होईल. तसेच उपवासामुळे आरोग्य सुधारते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेरचे खाणे टाळण्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणासाठी स्मिता गांधी, आदिती कोकाटे आणि भक्ती थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रृती सावरीकर यांनी केले.
माध्यमिक विभागाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात रंगला. अध्यक्षस्थान गुरु आनंद विहार सेवा मंडळाचे संस्थापक समीर प्रकाश बोरा यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून सोनाली समीर बोरा उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्राने झाली. पाहुण्यांचा परिचय अक्षरा गांधी हिने करून दिला. यावेळी विद्यार्थिनी सिद्धी दगडे, मोक्षा कटारिया आणि संयमी गुगळे यांनी भाषणातून संवत्सरी उत्सव व उपवासाचे महत्त्व स्पष्ट केले. उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
समीर बोरा म्हणाले की, पर्युषण पर्वातील उपवासाची परंपरा 2600 वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे. अशा निर्जळी उपवासामुळे शारीरिक व मानसिक शुद्धी होते, तसेच कॅन्सरसारखे आजारही दूर ठेवता येतात. उपवासाचे फायदे आयुष्य निरोगी आणि संतुलित करत असल्याचे ते म्हणाले.
माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनीही संवत्सरी उत्सवावर आधारित नृत्य-नाटिका सादर करून वातावरण रंगवले. या विद्यार्थ्यांना प्रिया भलगट, रेखा शर्मा, भारती हिंगे आणि सौ. अफसर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी नमन व मारिया तांबटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजनंदिनी त्र्यंबके हिने मानले.