दिवाळी केवळ घरातील सण नसून, समाजातील वंचितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा उत्सव -रूपा पंजाबी
उपक्रमातून आनंदाचा प्रकाश; अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित व अनाथ मुलांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा आणण्यासाठी समर्पण सेवा संस्थेच्या महिला सदस्यांनी दिवाळी भेटचा एक भावनिक उपक्रम राबविला. एमआयडीसी परिसरातील चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचलित बालगृहातील मुलांना नवीन कपडे, फराळ, दिवे आणि गोड पदार्थांची भेट देऊन त्यांची दिवाळी अविस्मरणीय केली.
बालगृहातील लहान मुलांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे हास्य खुलले, डोळ्यांत उत्सुकतेची चमक आणि हृदयात प्रेमाची भावना निर्माण झाली. समर्पण सेवा संस्थेच्या वतीने या मुलांसाठी केवळ भेटवस्तूच नव्हे, तर प्रेम, आपुलकी आणि आनंदाची खरी दिवाळी घेऊन त्या महिला पोहोचल्या होत्या. या उपक्रमात अध्यक्षा रूपा पंजाबी यांच्यासह कोमल सहानी, सुमन सहानी, सुनीता सहानी, सरोज गुर्ली, पूनम खुल्लर, अमृत मक्कर, बसंत वधवा, शशि आनंद, हेमा बस्सी, वर्षा तलवार, किरण, नीतू सलुजा, रोली जोहरी, रेखा पावा, मंजू अरोरा, बीना बत्रा, अंकिता जगी, दीपाली काशीद, प्रतिभा सबलोक, सोनिया कुंद्रा आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रूपा पंजाबी म्हणाल्या की, समर्पण सेवा संस्थेच्या सर्व महिला सदस्यांसाठी दिवाळी म्हणजे केवळ आपल्या घरातील सण नसून, समाजातील वंचितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा संकल्प आहे. अनाथ मुलांनाही आनंदाने सण साजरा करता यावा, त्यांना आपल्यापणाची जाणीव व्हावी, हीच आमची खरी दिवाळी असल्याचे त्यांनी सांगितले.
बालगृहातील विद्यार्थ्यांनी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांची मने जिंकली. त्यानंतर महिलांनी मुलांना जवळ करुन प्रेमाने दिवाळी भेट दिली. कोणत्याही नात्याचे बंधन नसतानाही आपलेपण या एका भावनेने तो सण अधिक सुंदर झाला. चॉकलेट, फराळ, आणि अल्पोपहाराचे वाटप झाल्यानंतर संपूर्ण बालगृह आनंदाने उजळून निघाले.
