भाकपच्या कार्यालयात पानसरे यांना लाल सलाम
उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज -प्रा. खासेराव शितोळे
नगर (प्रतिनिधी)- उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले
शहीद कॉम्रड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी शहरातील बुरुडगाव रोड वरील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात आयोजित अभिवादन सभेत प्राचार्य शितोळे बोलत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष, जिल्हा सहसेक्रेटरी कॉ. ॲड सुधिर टोकेकर, भारती न्यालपेल्ली, कॉ. श्रीधर आदिक, कॉ. भाऊसाहेब थोटे, आप्पासाहेब वाबळे, भगवानराव गायकवाड, फिरोज शेख, लक्ष्मण नवले, सतिश पवार, सुलाबाई आदमाने, बेबीनंदा लांडे, ज्ञानदेव गायकवाड, संगीता कोंडा, अफसाना शेख, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य शितोळे पुढे म्हणाले की, कॉम्रेड पानसरे यांनी राजकारण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात पुरोगामी विचारांसाठी मोठे योगदान दिले आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलने भरवून आण्णाभाऊ एका जातीचे नसून ते सर्व कामगार, शेतकरी व उपेक्षित वंचित घटकांचा आवाज होते. म्हणूनच त्यांची देशात व परदेशात ही ख्याती होती, कॉम्रेड पानसरे हे सर्व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळींचे मार्गदर्शक होते, असे त्यांनी सांगितले.
कॉ. सुभाष लांडे यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकऱ्यांना जामीन मंजूर होतो, मात्र अद्यापि शिक्षा होत नसल्याची खंत व्यक्त केली. मंजूर केलेला जामीन रद्द व्हावा, यासाठी राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात जामीन रद्द होण्यासाठी अपील करण्याची मागणी त्यांनी केली. उपस्थित मान्यवरांनी कॉम्रेड पानसरे यांच्या जीवनातील कार्य व विचारांवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. कॉ. ॲड. सुधीर टोकेकर यांनी आभार मानले.