• Thu. Feb 5th, 2026

वृक्षसंवर्धन व श्रमदानातून संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी साजरी

ByMirror

Feb 5, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; भिंगारमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश


भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रमदानाने दिली संतांना आदरांजली

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षसंवर्धन व श्रमदानाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे हा अभिवादन सोहळा सामाजिक जाणीव जपत पार पडला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस रतन मेहेत्रे, सुधीर कपाळे, सुभाष पेंढुरकर, प्रकाश देवळालीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरीषराव पोटे व महेशराव सरोदे यांच्या पुढाकाराने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.


यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण उद्यानात वाढलेले गवत व काटेरी झुडपे काढून परिसर स्वच्छ केला. तसेच लावलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. या कार्यक्रमासाठी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, जहीर सय्यद, रमेश वराडे, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपकराव धाडगे, दिलीप गुगळे, अशोक पराते, मनोहर दरवडे, दीपक घोडके, अविनाश जाधव, अभिजीत सपकाळ, रामनाथ गर्जे, विलास आहेर, इंजि. अनिल सोळसे, राजू कांबळे, निजाम पठाण, ताराचंद ठोकळ, भरत डंगोरे, संजय भिंगारदिवे, सूर्यकांत कटोरे, दीपक लिपाने, दशरथ मुंडे, सखाराम अळकुटे, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, अविनाश पोतदार, सुहास देवराईकर, आसाराम बनसोडे, संदीप छजलाने, दीपक अमृत, अजेश पुरी, संजय शिंगवी आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, “संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांनी समाजाला प्रामाणिक श्रम, सेवा आणि समतेचा मार्ग दाखवला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ भाषणे न करता प्रत्यक्ष श्रमदान व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून त्यांचे विचार कृतीत उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक, पर्यावरणीय व मानवी मूल्यांची जपणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन चोपडा म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. संत नरहरी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत. वृक्षारोपण, श्रमदान व स्वच्छतेतून समाजात सकारात्मक बदल घडवता येतो, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे म्हणाले की, “संत परंपरा ही केवळ पूजा-अर्चा करण्यापुरती मर्यादित नसून, त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची शिकवण देते. संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांनी कर्म, भक्ती आणि सामाजिक समतेचा मार्ग दाखवला. हरदिन मॉर्निंग ग्रुपने पुण्यतिथी श्रमदान व वृक्षसंवर्धनाने साजरी करून संत विचारांची खरी सेवा केली असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *