• Wed. Jul 2nd, 2025

सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांच्या प्रचाराला प्रारंभ

ByMirror

Nov 13, 2024

सत्ताधारी व विरोधकांनी आपापसात सत्ता वाटून घेतल्याने श्रीगोंद्याचा विकास खुंटला -विनोद साळवे

नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांनी निंबोडी (ता. नगर) येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडला. तर नगर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रचार रॅलीला प्रारंभ केला. श्रीगोंदा मतदार संघातील मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन प्रस्थापित घराणेशाही संपविण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले.


या प्रचार रॅलीत सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, धडक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, ह.भ.प. राजू महाराज पाटोळे, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा तनिज शेख, उपाध्यक्षा मालन जाधव, नितीन गोर्डे, सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, बाबू थोरात, ज्योतीताई पाटोळे, सुभाष काकडे, विजय जगताप, सरिता जगताप आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


विनोद साळवे म्हणाले की, सत्ताधारी व विरोधकांनी फक्त घरे भरण्यासाठी सत्ता राबवली. साकळाई योजनेवर फक्त राजकारण करुन शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे पाप येथील लोकप्रतिनिधींनी केले. आपापसात सत्ता वाटून घेतल्याने श्रीगोंद्याचा विकास खुंटला. शेतकरी, एमआयडीसी, कामगार व युवकांच्या प्रश्‍नाकडे डोळेझाक केल्याने या मतदार संघातील प्रश्‍न गंभीर बनले आहेत. शिक्षण सम्राटांनी घराणेशाहीच्या जीवावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. तर प्रस्थापित घराणेशाही विरोधात जनसामान्यांच्या हितासाठी व विकासासाठी उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.


रावसाहेब काळे पाटील म्हणाले की, सैनिक समाज पार्टीने स्वच्छ चारित्र्य असलेल्या उच्च शिक्षित युवा उमेदवाराला संधी दिली आहे. प्रस्थापित घराणेशाहीला पर्याय देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. जनतेची सेवा म्हणून व शेतकरी वर्गाचा विकास साधण्यासाठी सैनिक समाज पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *