अहमदनगर लोकसभेसाठी उत्तरेतून डॉ. दरेकर व दक्षिणेतून डॉ. कोरडे यांच्या नावाला मंजूरी
सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबध्द -डॉ. श्रीधर दरेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देऊन, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबध्द आहे. सत्ताधारी व विरोधक स्वत:चे हिता साधत असल्याने त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तर पिढ्यानपिढ्या चालत असलेली घराणेशाहीला पर्याय देण्यासाठी माजी सैनिकांच्या पुढाकाराने सैनिक समाज पार्टी सर्व निवडणुकांना सक्षमपणे सामोरे जाणार असल्याची भावना डॉ. श्रीधर दरेकर यांनी व्यक्त केली.
सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थितीवर चर्चा करुन भविष्यातील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सैनिक समाज पार्टीची राज्यस्तरीय बैठक डॉ. दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी दरेकर बोलत होते. चांदणी चौक येथील सैनिक कल्याण बोर्डाच्या सभागृहात झालेल्या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रभारी ईश्वर मोरे (जळगाव), जागृत मंचचे संस्थापक अध्यक्ष शिवराम पाटील, राज्य कार्याध्यक्ष तुकाराम डफळ, राज्य संघटक सुनिल अंधारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समीर खानोलकर, कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण, सांगली जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोसले, उपाध्यक्ष विठ्ठल भोसले, गडचिरोली जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम, विधानसभा प्रमुख हंसराज उराडे, महिलाध्यक्षा रुपाली कावळे, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे, सचिव बबन कोळी, लातुर जिल्हाध्यक्ष विष्णू टेकाळे आदींसह माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून समाजातील समस्या सोडविल्या तरच समाज पक्षाला जोडला जाणार आहे. पक्ष संघटन, नेतृत्व कौशल्य हे घटक पार्टीसाठी अत्यावश्यक असून सद्यस्थितीतील गढूळ राजकारण हे विकासासाठी घातक आहे. समाजात पसरलेला भ्रष्टाचार, जातीयवाद यामुळे समाजात दरी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना विकासापासून वंचित व योग्य उमेदवारांना राजकारणापासून लांब ठेवण्याचे काम भ्रष्ट राजकारणी करत आहे. त्यांना सत्तेतून पाय उतार करुन सर्वसामान्यांच्या हाती सत्ता देण्यासाठी सैनिक समाज पार्टी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला उपस्थित असलेले कोल्हापूर, सांगली, जळगाव, पुणे, गडचिरोली येथील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजकारणावर चर्चा करुन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा मांडला. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यासह माजी सैनिकांची एकजुट असलेल्या इतर जिल्ह्यातही लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर लोकसभेसाठी उत्तरेतून डॉ. श्रीधर दरेकर व दक्षिणेतून डॉ. गोरक्षनाथ कोरडे यांच्या नावाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तर शहर विधानसभेसाठी सक्षम उमेदवार न मिळाल्यास ॲड. शिवाजी डमाळे यांनी निवडणुक लढविण्याची सूचना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मांडली.
या बैठकीत श्रीकांत पाखरे, अतुल शेरवाने, भाऊसाहेब भुजबळ, विठ्ठल शिंदे, अशोक कचरे, हसन तांबोळी, काशिनाथ ठुबे, भागा निमसे, राकेश वाघ, बाळु पठारे आदींसह माजी सैनिक व नागरिकांनी सहभाग नोंदवला. प्रदेश महासचिव अरुण खिची यांनी आभार मानले.