23 ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील बँक कॉलनी साईबाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाचे प्रारंभ ग्रंथ पूजनाने पार पडले. श्री साईबाबा फाउंडेशन बँक कॉलनी आयोजित साईबाबा मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त 17 ते 24 ऑगस्ट दरम्यान साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.17 ऑगस्ट) शोभना मातोश्री यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. श्री साईं सच्चरित्र ग्रंथ पारायण पाठ श्रीनिवास सहदेव यांच्या मधूर वाणीतून होणार आहे. केडगाव परिसरातून शुक्रवारी दि. 23 ऑगस्ट दुपारी 3 वाजता श्री साईबाबा पालखी मिरवणूक निघणार आहे. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी काकड आरती दिलीपशेठ नागरे यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळची आरती आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 9.30 वाजता श्री साई कथावाचक मधुरताई शिंदे (शिर्डी) यांचे प्रवचन होईल. मध्यान्ह आरती उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. दुपारी 12.30 ते 3 पर्यन्त महाप्रसादचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. मुकुंद शेवंगावकर यांनी दिली. साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे, डॉ. मुकुंद शेवंगावकर, अशोक झीने, अजितसिंग दाढीयाल, सुनील कुलकर्णी, अशोक जाधव, कावेरी जाधव, प्रकाश वाघ, संगिता कातोरे, कोळी काका, दडियाल भाभी आदी परिश्रम घेत आहे.
