श्री साई बाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक उपक्रम
भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- केडगाव, बँक कॉलनी येथील श्री साई बाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दि. 6 ते 13 ऑगस्ट दरम्यान हा धार्मिक सोहळा रंगणार आहे. परिसरातील भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. मुकुंद शेवंगावकर यांनी केले आहे.
बुधवार दि. 6 ऑगस्ट रोजी श्री व सौ राजू सातपुते यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून या सप्ताहाचे प्रारंभ होणार आहे. श्री साई सच्चरित्र ग्रंथ पारायण पाठ श्रीनिवास सहदेव यांच्या मधूर वाणीतून होणार आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी केडगाव मधून दुपारी 3 वाजता श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ऑगस्टला काकड आरती दिलीपशेठ नागरे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी माजी नगरसेवक अमोल येवले यांच्या हस्ते आरती होऊन श्री साई कथावाचक माधुरीताई शिंदे (शिर्डी) यांचे प्रवचन होणार आहे. मध्यान्ह आरती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12:30 ते 3 पर्यन्त महाप्रसादचे आयोजन करण्यात आले असल्याचे म्हंटले आहे.