विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार
गावातून छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्याची निघणार ग्रंथ दिंडी
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 14 मे रोजी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन होत असून, राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वयं उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी विविध भाषांचे सखोल अध्ययन केले होते तसेच अभ्यासपूर्ण ग्रंथनिर्मितीही केली होती. त्यांच्या कार्यातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी गावातून छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यावर आधारित ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. यानंतर परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने होणार आहेत. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार असून, त्याद्वारे ग्रामीण भागातील काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीचेही आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या समारोपीय सत्रात सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग व पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी प्रस्ताव 7 मे 2025 पर्यंत पै. नाना किसन डोंगरे, अध्यक्ष, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा, ता. नगर, जि. अहिल्यानगर – 414005. या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे यांच्याशी 9226735346 / 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.