ग्रामीण भागांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नागरी सुविधा निर्माण करणार -गोरे
नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, शिवसेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष प्रशांत खळेकर, संतोष विधाते, निखिल झगडे, अरुण जाधव, संकल्प पवार आदी उपस्थित होते.
गणेश बनकर यांनी भाजप ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात आलेली पक्षाची बांधणी व सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शेतकरी बांधवांना मुलभूत नागरी सुविधा निर्माण करुन देण्याचा उद्देश राहणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण, सिंचन, घरकुल योजना आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर गणेश बनकर यांचे पक्षाच्या माध्यमातून उत्तमपणे कार्य सुरु असून, त्यांच्या सदैव पाठिशी राहून प्रश्न सोडविण्याचे काम करण्याचे मंत्री गोरे यांनी आश्वासन दिले.