• Wed. Mar 12th, 2025

वाळकीचे वायुदलातील निवृत्त अधिकारी सोमनाथ कासार यांचे निधन

ByMirror

Jun 22, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील वायुदलातील निवृत्त अधिकारी तथा वृक्षमित्र सोमनाथ राऊ कासार यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ते 62 वर्षाचे होते.


फुफ्सांच्या आजारावर अनेक महिन्यांपासून ते उपचार घेत होते. पुणे येथील हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. मनमिळाऊ स्वभाव व धार्मिक प्रवृत्तीमुळे ते गावात सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना असा कुटुंब आहे. त्यांचे दोन्ही मुले व सुना अमेरिकेत उच्च पदावर कार्यरत आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचे ते मेव्हणे होते.


हलाखिच्या परिस्थितीत शेतकरी कुटुंबातून आलेले कासार शिक्षण घेऊन भारतीय वायुदलात दाखल झाले व आपल्या गुणवत्तेने ज्युनिअर वॉरंट ऑफिसर पदा पर्यंत त्यांनी मजल मारली. दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले. वायुदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (जि. पुणे) येथे सेवा केली. शहरात मन रमत नसल्याने व निसर्ग संवर्धनाची आवड असल्याने गावात येऊन आपल्या शेतात पिक न घेता मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करुन झाडांचे संवर्धन केले.

शेतात बाग फुलविणारे ते पहिले शेतकरी होते. कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांना स्वखर्चाने ऑक्सिजन मशीन पुरविण्याचे कार्य केले. त्यांच्या अंत्यविधी वाळकी येथे शोकाकुल वातावरणात झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *