जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
बाबासाहेबांच्या संविधानाचा वारसा जपणे हीच त्यांना खरी मानवंदना -सुनील साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यात आले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. लाखो अनुयायांच्या उपस्थितीत जय भीम”च्या घोषणांनी हा अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय महिला नेत्या सीमातार्इ आठवले, युवा नेते जीत आठवले, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, तसेच चैत्यभूमी परिसरात जिल्ह्यातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
रामदास आठवले यांनी या प्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपावी, असे प्रतिपादन केले. सुनील साळवे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या परिवर्तनाचे शिल्पकार आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्यायावर आधारलेले संविधान दिले.
समाजातील सर्व वंचित आणि पीडित घटकांना समान हक्क देण्याचे काम त्यांनी संविधानाद्वारे केले. आज आपण चैत्यभूमीवर उभे राहून बाबासाहेबांना अभिवादन करत आहोत, ती फक्त औपचारिकता नाही तर त्यांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांचे उद्दिष्ट पुढे नेण्याची शपथ आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांचा आवाज असून, बाबासाहेबांच्या विचाराने समाजात कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
