गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव; सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
नगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील शैक्षणिक, कला, क्रीडा व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तर शाळेत रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
प्रारंभी भारतीय सैन्य दलातील पवन मुठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देवराम कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संचालक राजेंद्र शेळके, गणेश सातपुते, भोयरे पठारचे सरपंच बाबा टकले, भोयरे खुर्दचे सरपंच राजूशेठ आंबेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कवडेश्वर सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, राजेश बोरकर, गणेश मुठे, रवी आंबेकर, अमोल टकले, सुनील मोठे आदींसह ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब शेख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक प्रवाहाबरोबर अद्यावत ज्ञान देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. तर शाळेच्या वाढत्या गुणवत्तेचा आढावा त्यांनी घेतला.
नगर तालुका गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये सत्यम संपत उरमुडे याने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर त्याची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले. मोठ्या संख्येने उपस्थित पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. सचिन मुठे व पवन मुठे यांच्या तर्फे सर्व मुलांना जेवणाचे डबे व शिक्षकांना वार्षिक डायरी भेट दिली. ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.