व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या व पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करुनही कारवाई होत नसल्याने कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली. यावेळी सायली कुलकर्णी, गायत्री जोशी, मनीषा कडेकर, रसाळ काकू, सौ. जोशी, प्रीतम गुगळे, अमेय मुदकवी, प्रमोद कुलकर्णी, संजय कुलकर्णी, शरद नगरकर, वसंत कुलकर्णी, सुबोध कुलकर्णी, शाम कडेकर, मोहन जोशी, भास्कर जावळे, व्यंकटेश देशपांडे, दीपक दीकोंडा आदींसह ठेवीदार उपस्थित होते.
पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहरातील जुने कोर्ट येथील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ही शाखा कार्यान्वीत आहे. ठेवीदारांनी सदर पतसंस्थेमध्ये संबंधित संचालक तसेच व्यवस्थापक यांच्या भूलथापांना बळी पडून 12 ते 14 कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. या ठेवी परत मिळत नसल्याने पतसंस्थेत अडकून पडल्या आहेत.
या प्रकरणी ठेवीदारांनी 13 डिसेंबर 2024 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार केलेली आहे. सदर तक्रारीवर आवश्यक ते आदेश देखील पारित केलेले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश भ्रमणध्वनीद्वारे दिलेले होते. असे असताना देखील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यात आलेला नसल्याचे म्हंटले आहे.
सदर ठेवी परत मिळत नसल्याने सर्व ठेवीदार अस्वस्थ असून, पतसंस्थेवर कारवाई केली जात नसल्याने असंतोष निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करुन पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणी ठेवीदारांनी केली आहे.