• Sat. Mar 21st, 2026

कामरगाव येथील माळवाडी नजीकच्या वस्तीचे ‘समतानगर’ नामांतर

ByMirror

Feb 4, 2026

समतेचा ऐकतेचा संदेश; ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर


नामांतर फलकाचे अनावरण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. जि. अहिल्यानगर) येथील माळवाडी नजीक असलेल्या रहीवासी वस्तीचे ‘समतानगर’ असे नामांतर करण्यात आले आहे. या सामाजिक समता, समानता व बंधुभावाचा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नामांतर करण्यात आले.


कामरगाव ग्रामपंचायतीने याबाबत अधिकृत ठराव संमत केला असून, त्यानंतर या नामांतराचे फलक परिसरात लावण्यात आले आहेत. या फलकाचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


यावेळी बोलताना गणेश बनकर यांनी सांगितले की, समतानगर हे नाव सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आणि एकतेचा संदेश आहे. या परिसरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी रस्ता, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी शासनाकडून आवश्‍यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


“आजचा हा कार्यक्रम केवळ एका वस्तीचे नामांतर नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाचा एकतेचा आणि समतेच्या विचाराचा एक टप्पा आहे. प्रत्येक नागरिकाला सन्माना मिळावा या भावनेतून समतानगर हे नाव देण्यात आले असल्याचेही बनकर यांनी सांगितले.


कार्यक्रमास सरपंच संदीप ढवळे, कामरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम ठोकळ, माजी सरपंच तुकाराम कातोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शामराव ठोकळ, मधुकर झरेकर, राजू शिंदे, मेजर दादा झरेकर, गणेश आंधळे, राधाकृष्ण चौधरी, वैभव लाळगे, करण कातोरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच संदीप ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मेजर राजू शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *