अहिल्यानगरात केमिस्ट असोसिएशनची माहितीपर बैठक; सीए प्रसाद पुराणिक यांचे केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन
औषधांवरील जीएसटी कमी करुन सरकारने सर्वसामान्य रुग्णांना थेट दिलासा दिला -दत्ता गाडळकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने नुकतेच औषधांसह काही अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये बदल केला असून, या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने माहितीपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहर व तालुक्यातील रिटेलर, होलसेलर तसेच असोसिएशनचे सर्व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बैठक केमिस्ट भवन येथे पार पडली. या वेळी सीए इन्स्टिट्युट अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक यांनी नव्या बदलांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जीएसटी जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक निखील वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनीष सोमानी, खजिनदार मनोज खेडकर, सहसचिव मनिषा आठरे, कमलेश गुंदेचा, आशुतोष कुकडे, युवराज खेडकर, अवधूत बोरुडे, रुपेश भंडारी, महेश आठरे, राजेंद्र बलदोटा, सुधीर लांडगे, सागर फुलसौंदर, महेंद्र अनमल, राजेंद्र बेंद्रे, संकेत गुंदेचा, संदीप कोकाटे, महेश अनमल, आदेश जाधव, सुधाकर बोरुडे, मिलिंद क्षीरसागर, नितीन गांधी, डॉ. कडूस, नितीन सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
सीए प्रसाद पुराणिक यांनी उपस्थित सभासदांना जीएसटी स्लॅबमधील बदलांची माहिती देताना सांगितले की, नुकत्याच झालेल्या बदलांनुसार काही औषधांच्या श्रेणींवर जीएसटीचा दर कमी करण्यात आला आहे. यामुळे औषधांच्या किमतीत थेट परिणाम होणार असून नागरिकांना स्वस्तात उपचार मिळणे शक्य होईल. फार्मा क्षेत्रातील व्यवहार करताना लेखा प्रक्रिया आणि जीएसटी रिटर्न फाइलिंग करताना अनेक लहान-सहान शंका निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल. औषध व्यापाऱ्यांनी जीएसटी बदलांची योग्य माहिती घेतल्यास व्यवहारात गोंधळ टळेल आणि ग्राहकांनाही योग्य लाभ देता येईल. सरकारच्या या निर्णयामुळे औषध वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल तसेच कर भार कमी झाल्याने दीर्घकाळ नागरिकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर म्हणाले की, औषधांवरील जीएसटी कमी करुन सरकारने सर्वसामान्य रुग्णांना थेट दिलासा दिला आहे. यामुळे औषधांच्या किंमतीत काही प्रमाणात घट होणार असून, उपचाराचा आर्थिक ताण कमी होईल. नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होतील, ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे ते म्हणाले.
जीएसटी जिल्हा समन्वयक निखील वारे यांनी सांगितले की, भाजप सरकारने वस्तूंवरील जीएसटी कपातीद्वारे सर्व भारतीय नागरिकांना आर्थिक सवलत दिली आहे. विकासात्मक धोरणे आखताना थेट सर्वसामान्यांचा विचार केला जातो आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारतासारख्या योजनांना या निर्णयाचा पूरक फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औषधांवरील जीएसटी दर कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे पत्र जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जीएसटी जिल्हा समन्वयक निखील वारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित धाडगे यांनी केले तर आभार मनीष सोमानी यांनी मानले.
