• Tue. Mar 10th, 2026

आदिवासींच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनीवर मालकी हक्काची नोंद लावा

ByMirror

Nov 4, 2024

एकलव्य संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- आदिवासी कुटुंबाकडे मागील दहा वर्षापासून ताब्यात असलेल्या सरकारी गायरान जमिनीच्या 7-12 उताऱ्यावर मालकी हक्काची नोंद लावण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळासह आदिवासी कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी सागर गायकवाड, सचिन गायकवाड, समिंद्र गायकवाड, अनिल गायकवाड, राजेंद्र गायकवाड, मंदा गायकवाड, सुरेखा शिंदे, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.


ब्रम्हाणपूर आव्हाणे (ता. शेवगाव) व आठवडवाडी, डमाळवाडी ता. (पाथर्डी) येथील गायरान जमिनीवर मागील दहा वर्षापासून आदिवासी कुटुंबीय राहत आहे. सदर जमीन सरकारी मालकीची असून, त्या जमिनीवर आदिवासी कुटुंबीय शेती करुन उदरनिर्वाह करत आहे. या जमिनीवर गेल्या दहा वर्षापासून अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे पोलीस केस, खटले दाखल झालेले नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


शासनाच्या नियमाप्रमाणे भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे, या धोरणानुसार गेल्या दहा वर्षापासून सदरची जमिन ताब्यात असल्याने आदिवासी कुटुंबीयांना मालकी हक्क मिळाला पाहिजे. सदर जमिनीवर पीक पाहणी होण्यासाठी तलाठी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज करुन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ब्रम्हाणपूर आव्हाणे (ता. शेवगाव) येथील 7-12 उताऱ्यावर महसूल रेकॉर्डला मालक व वहीवाटदार म्हणून नोंद लावण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *