खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीप्रमाणे कलमे लावण्याची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर रात्री एका जमावाकडून मागासवर्गीय युवक रंजीत देवराम वैरागर याच्यावर जीवघेणा हल्ला झालेला असताना बारा दिवस उलटून देखील आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नसताना आरोपींवर खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कलमे लावून गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर महिला आघाडीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा शहराध्यक्षा ज्योती पवार यांनी दिला आहे.
लालटाकी येथे राहत असलेल्या रंजीत देवराम वैरागर याच्यावर 9 सप्टेंबर रोजी लिंक रोड या ठिकाणी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोक्यावर व पाठीवर त्यांना टाके पडले असून, ते अद्यापि एका खासगी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. ही घटना होऊन बारा दिवस उलटूनही युवक मातंग समाजातील असल्याने पोलीस प्रशासनाने दखल घेत नसून, आरोपींना पाठिशी घालण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचार घडत असताना, मागासवर्गीय युवकावर हल्ला होऊन अनेक दिवस उलटून देखील त्याचा जबाब घेतला जात नाही. पोलीसांनी त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या असून, त्याला देखील याबाबत माहीती दिलेली नाही. हा देखील एक प्रकारचा जातीय अत्याचार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तर मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी व ॲट्रॉसिटी ॲक्ट कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.