नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची फेरनिवड झाल्याबद्दल नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, मंदा साळवे, अमोल वाबळे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव, अरुण कापसे, राम जाधव, लहानू जाधव, दिपक जाधव, सोमा आतकर आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
नुकतीच नगर तालुका क्रीडा समितीची बैठक जिल्हा क्रीडा कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत डोंगरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल नुकतेच निमगाव वाघा (ता. नगर) येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पै.नाना डोंगरे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे. खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनाने विविध स्पर्धा राबवून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड म्हणाले की, ग्रामीण भागात विविध क्रीडा स्पर्धा घेऊन डोंगरे यांनी नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. गावातील खेळाडू घडविण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरु असते. क्रीडा समितीच्या माध्यमातून त्यांच्याकडून उत्तम प्रकारे कार्य होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, प्रत्येक वर्षी नगर तालुकास्तरावर पाच स्पर्धा घेतल्या जात होत्या. यामध्ये 5 वाढीव स्पर्धा घेऊन एकूण दहा स्पर्धा होणार आहे. नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून खेळाला चालना देऊन खेळाडू घडविण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.