बर्फ व वारंवार पडणाऱ्या दाट धुक्यांच्या परिस्थितीत केली 6 हजार 111 मीटरची चढाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भंडारदरा, रतनवाडी (ता. अकोला) येथील गिर्यारोहक रवी झडे याने हिमाचल प्रदेश मधील भरतपूर येथील 6 हजार 111 मीटर उंच युनाम शिखर यशस्वीपणे सर केले. या शिखराची अवघड आणि आव्हानात्मक चढाई त्यांनी 12 तासात पूर्ण केली. बर्फ व वारंवार पडणाऱ्या दाट धुक्यांच्या परिस्थितीत पूर्ण करुन त्यांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकाविला.
धुक्यामुळे अत्यंत कमी असलेली दृश्यमानता आणि ऑक्सिजनच्या कमी पातळीत चिकाटीने आणि धैर्याने हा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. भंडारदरा परिसरात एका गरीब आदिवासी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने युनाम शिखर सर करुन नवोदित गिर्यारोहकांसाठी एक प्रेरणा दिली आहे. सह्याद्रीच्या शिखरावर 6 वर्षांपेक्षा जास्त असलेला ट्रेकिंग व रॉक क्लाइंबिंगचा अनुभव त्यांना या मोहिमेसाठी उपयोगी आअला.

सह्याद्रीतील गिरिशिखर चढताना निर्माण झालेला हिमालयाचा ध्यास आणि सुरक्षितता ह्या गोष्टीला दिलेलं प्राधान्य यामुळे सिक्कीम येथील आयएचसीएई येथून बेसिक माउंटेनियरिंग हा कोर्स रवी झडे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. माऊंट अबू येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग इथून रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणाचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.
रवी झडे यांनी या प्रवासातील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे युनामच्या शिखरावरुन सर्वत्र पसरलेले पर्वत, तलाव आणि हिमनद्या यांचे अप्रतिम 360 अंशाचे दृश्य होते. हा प्रवास अविस्मरणीय करणारा अनुभव होता. ही साहसी मोहीम आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली. हे यश गिर्यारोहण प्रवासातील एक मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.