हिंदी-मराठी गाण्यांनी सजलेल्या स्वरांच्या संगीत सोहळ्यात श्रोते मंत्रमुग्ध
नगर (प्रतिनिधी)- धनश्री म्युझिक ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित स्नेहालय संचलित अनामप्रेम मधील दृष्टीहीन गायकांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांचा दिल से सारेगामापाची संगीत मैफल शहरात रंगली होती. दृष्टीहीन गायकांना मंच उपलब्ध करुन त्यांना प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीगीत, प्रेमगीत आणि देशभक्तीच्या हिंदी-मराठी गाण्यांनी सजलेल्या स्वरांच्या संगीत सोहळ्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले.
इंडियन आयडॉल फेम गायक हेमंत कुमार राठोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक साईराम अय्यर यांची विशेष उपस्थिती होती. टिळक रोडवरील नंदनवन लॉन येथे झालेल्या दिल से सारेगामापाचे उद्घाटन सेवानिवृत्त मेजर अशोक कुमार सिसोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी अनाम प्रेमचे अध्यक्ष अजीत माने, पत्रकारांच्या अधिस्विकृती समितीचे नाशिक विभागीय अध्यक्ष सुधीर लंके, हेमंत कुमार राठोर, डॉ. दमन काशीद, युवा गायिका अंजली गायकवाड, वसंत बोरा, अंगद गायकवाड, सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती सारा दुर्गा, मॉडेल प्रसाद बोगावत यांच्यासह अनाम प्रेम मधील दृष्टीहीन गायक-गायिका व कलाकार उपस्थित होते.
देवा हो देवा… गणपती देवा… या गीताचे सादरीकरण करुन अनामप्रेमच्या कलाकारांनी दिल से सारेगामापा कार्यक्रमाची सुरुवात केली. गौरी या गायीकीने गायलेल्या कर्मा चित्रपटातील दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए!…. या गीताने वातावरण देशभक्तीमय केले. तर सत्यम शिवम सुंदरम…. गीत सादर करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट अनाप्रेमच्या कलाकारांना दाद दिली.

नंदनवनच्या हिरवळीवर संगीतची रम्य संध्याकाळ बहरली होती. राहुल पेटारिया या अनामप्रेमच्या विद्यार्थ्याने एका हाताने टाळी वाजवून, हाताने तबल्याचे बोल वाजून कव्वाली व भजन सादर करुन उपस्थितांनी अवाक केले. प्रशांत त्रिभुवन यांनी माऊथ ऑर्गनचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
इंडियन आयडॉल फेम गायक हेमंत कुमार राठोर यांनी लगी तुमसे मन की लगन…. या गीताने वातावरण प्रफुल्लित केले. तर हिरे मोती मैना चाहू, मै तो चाहू संगम तेरा! हे आपल्या पहाडी आवाजाच्या शैलीत सादर करुन उपस्थितांची वाहवाह मिळवली. सुदर्शन राव यांनी सेक्सोफोनच्या वाद्याने पहिली नजर में पहला प्यार हो गया… चे संगीत वाजवले.
अंजली गायकवाड हिने भोर भरे पनघट पे!…. गीत सादर केले, तर ए वतन वतन आबाद रहे तू!… या देशभक्ती गीताने अंगावर शहारे आणले. तसेच अंजली हिने अधीर मन झाले!… या मराठी गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक साईराम अय्यर यांनी आशा भोसले यांच्यासह इतर महिला गायिकांच्या हुबेहुब आवाजात गीत सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. तर अय्यर यांनी तू मिले दिल खिले!…., पहिला नशा पहिला खुमार!… या गीतांनी संगीत मैफलीत रंग भरला.
हेमंत कुमार राठोर यांनी नुसरत फतेह अली खान यांची तेरे बिन जिया जाये ना…., अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने की!… हे हिंदी चित्रपटातील गाणे सादर केले. सुनील देठे या कलाकाराने या अली रहम अली… हे गीतचे सादरीकरण केले. उत्कृष्ट वाद्यांचे सादरीकरण व गायकांचे मनाला भिडणाऱ्या स्वरांनी संध्याकाळ रंगली होती.
विविध वाद्य कलाकारांनी गायकांना उत्कृष्ट साथ दिली. यामध्ये गिटार वादनसाठी अजित अमर डमीन, संजय आठवले, संकेत देहाडे, ड्रमसेटवर प्रशांत त्रिभुवन, चाणक्य देवचक्के, काँगोवर सोनू साळवे, कच्छी ढोलवर कुमार साळवे, रिदम मशीन व ॲक्टो पॅडसाठी बंटी ओहोळ, ढोलक व तबल्यासाठी जॉय जाधव यांनी साथ दिली. कवियत्री व सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. आर.जे. प्रसन्ना यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. काशीद हॉस्पिटल व वसंत पेंट्स या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.
