सामाजिक प्रश्नांवर जागृती करुन महापुरुषांच्या विचारांचा जागर; विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव
समाजात झालेला गौरव आनखी काम करण्यास बळ देतो -खासदार निलेश लंके
नगर (प्रतिनिधी)- समाजात झालेला गौरव आनखी काम करण्यास बळ देतो. तर कविता जीवनातील संघर्षाला स्फुर्ती देत असतात. समाजात उत्तम कार्य करणाऱ्यांना पुरस्कार रूपाने प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. हा विचार घेऊन निमगाव वाघात महापुरुषांच्या जयंतीचा झालेला कार्यक्रम समाजाला दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठवे काव्य संमेलन व विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात खासदार लंके बोलत होते. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नगर तालुका तालिम सेवा संघ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावातील परिवार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे, कार्याध्यक्ष ह.भ.प. संगीता (माई) गुंजाळ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, सिने कलाकार मोहनीराज गटणे, काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, प्रा. लीला जंजीरे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, साहेबराव बोडखे, दिलावर शेख, लिला मुळे, सरपंच संजय निगडे, डॉ. विजय जाधव, कवी गीताराम नरवडे, नामदेव भुसारे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले की, समाजाशी बांधिलकी ठेवून प्रत्येकाने जीवनात वाटचाल करावी. महापुरुषांचे विचार अंगीकारून सामाजिक योगदान द्यावे. समाजासाठी जगलेला व्यक्ती मेल्या नंतरही कीर्ती रुपाने जिवंत राहतो. समाजात वाईट प्रवृत्तीचे लवकर अनुकरण होते, तर चांगल्या गोष्टी समाजात रुजवायला वेळ लागतो. चांगल्या कामांनाही नाव ठेवले जाते, यासाठी त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाने आपले सामाजिक कार्यपुढे घेऊन जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
काव्य संमेलन उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी यांनी महापुरुषांची जयंती त्यांचे विचार रुजविण्यासाठी व सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी काव्य संमेलन व पुरस्कार प्रदान सोहळ्यातून होत असल्याचे स्पष्ट केले.
संपत गर्जे म्हणाले की, शब्द भावनांचा अविष्कार असतात. कविता उत्स्फूर्तपणे फुलली पाहिजे. शब्द आशयाचे धनी म्हणून व्यक्त होतात. शब्दातून अर्थ उमगतो, मनातून शब्द बाहेर पडल्यावर कविता होतात. उत्तम कविता मनाला भिडते. ओढून ताणून कविता होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
संगीता (माई) गुंजाळ म्हणाल्या की, अंधारलेल्या समाजात सामाजिक काम करणाऱ्या पणत्या म्हणून अंधकार दूर करण्याचे काम करत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याने उपेक्षितांना आधार मिळत आहे. किती जगले, यापेक्षा कसे जगले। याला महत्त्व आहे. महापुरुषांचे जयंती-पुण्यतिथी व धार्मिक सोहळे सामाजिक उपक्रमाने साजरे करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोहनीराज गटाने यांनी काव्यातून जीवनाला स्फूर्ती मिळत असल्याचे सांगितले. लक्ष्मण पाटील यांनी आपल्या काव्यातून वृद्धाश्रमाची व्यथा मांडली. हेमलता गीते यांनी हसत खेळत विद्यार्थी शिक्षकांचे अतूट नाते काव्यातून मांडले.
काव्य संमेलनात नीलाताई मुळे यांनी देशभक्ती या काव्यातून समाजसेवेचा आढावा घेतला. बबनराव आढाव यांनी माझ्या आईचे माहेर मधून आईच्या माहेराची महती सांगितली. हेमलता गीते यांनी हसत हसत का नाही? या काव्यातून विद्यार्थी व शिक्षकांचे नाते उलगडले. रेणुका ताठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम काव्यातून मांडला. अभिजीत सोनवणे यांनी प्रेम कविता सादर करून प्रेमाचा वर्षाव केला. लीला जंजिरे यांनी मागे वळून बघ… या कवितेतून साडीच्या पदराची अलौकिकता सांगितली. प्राजक्ता पालवे यांनी जीवन म्हणजे काय? या काव्यातून जीवन जगण्याचा दृष्टिकोन सांगितला. देव थोरात यांनी चुल व माय यांचे अतूट नाते काव्यातून स्पष्ट केले. जयश्री सोनवणे यांनी सपान या काव्यातून बळीराजाच्या व्यथा मांडल्या. बालशाहीर ओवी काळे हिने शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे सादर केले. संदिप पाचारणे, ज्ञानेश्वरी मतकर, प्रांजल विरकर, जयश्री मंडलिक, देवीदास बुधवंत, सुभाष सोनवणे यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. पंडित महेश खोपटीकर यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम यावेळी रंगला होता. उपस्थितांनी कवींसह कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. खासदार लंके यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रा. लीला जंजीरे लिखित भाकरी या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी भागचंद जाधव, उपसरपंच किरण जाधव, डॉ. विजय जाधव, नामदेव भुसारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा सोनवणे यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.
पुरस्कार सन्मानार्थी पुढील प्रमाणे:-
ज्ञानदेव पांडुळे (संत गाडगे महाराज समाजरत्न पुरस्कार), संतोष कानडे (छ. शिवाजी महाराज गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार), मोहनीराज गटणे (छ. शिवाजी महाराज कलारत्न पुरस्कार), ह.भ.प. संगिता (माई) गुंजाळ (छ. शिवाजी महाराज वारकरी भुषण पुरस्कार), महेश खोपटीकर (छ. शिवाजी महाराज कला गौरव पुरस्कार), अहमद शेख (संत गाडगे महाराज साहित्य रत्न पुरस्कार), राजेंद्र भोस (छ. शिवाजी महाराज समाजरत्न पुरस्कार), जालिंदर गायकवाड (छ. शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार), हेमलता गीते (छ. शिवाजी महाराज समाजरत्न पुरस्कार), एकनाथ पालवे (छ. शिवाजी महाराज शिक्षक रत्न पुरस्कार), गोदावरी द्याडे (छ. शिवाजी महाराज अनाथांची आई पुरस्कार), बस्वराज द्याडे (छ. शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार), अशोक भालके (संत गाडगे महाराज स्वच्छता दूत पुरस्कार), ओवी काळे (छ. शिवाजी महाराज पोवाडारत्न पुरस्कार), सावळेराव बळे (छ. शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार).