मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढतो -प्रा. शिवाजीराव घाडगे
विविध मैदानी स्पर्धेत खेळाडूंनी दाखवले कौशल्य
नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक बालक्रीडा मेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली.
बालक्रीडा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे, संस्थेचे सहसचिव नितीन घाडगे, क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक दत्तात्रय दरेकर, संतोष उरमुडे, जगदीश आव्हाड , राजेंद्र शिंदे , उल्का गवते, नंदा दुधाने, सुनंदा शिरसाठ, कोमल पाटील, भूतमपल्ले मॅडम, राजू नरोडे, कैलास उमाप, केशव गुंजाळ, राजकुमार इटेवाड, रामभाऊ पोटे, अभिजीत सांगळे, नितीन शिंदे, सोनवणे आदींसह शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य शिवाजीराव घाडगे यांनी खेळाडूंना अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व विशद केले. कोणताही खेळ हा स्पर्धेपुरता न खेळता पुढे त्याचा सराव सातत्याने चालू ठेवण्याचे आवाहन केले. मुलांना खेळात करिअर करायचे असेल तर पालकांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. एकतरी आवडीचा मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी सांगितले.
पर्यवेक्षक दत्तात्रय दरेकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करुन जीवनात खेळाचे महत्त्व पटवून दिले. खेळामध्ये जय-पराजय महत्त्वाचा नसून स्पर्धेत उतरणे व आपल्यातील कौशल्य दाखवणे महत्त्वाचे असते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उद्घाटनाप्रसंगी ढोल ताशाच्या गजरात सादरीकरण केले. यावेळी खो-खो, कबड्डी, थाळीफेक, गोळा फेक, धावणे मनोरंजनाचे खेळ, स्लो सायकलिंगचे सामने मैदानावर अतिशय चुरशीने रंगले होते. पंच म्हणून संतोष उरमुडे, कैलास उमाप तसेच कोलते, तिकटे, कवाने, रोमन यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन राजू नरोडे यांनी आभार मानले.